इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या सोळाव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. या मिनी लिलावासाठी ९९१ खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत. त्यापैकी सर्वाधिक ७१४ क्रिकेटपटू भारतातील आहेत.
भारताशिवाय इतर १४ देशांतील खेळाडूंनीही नोंदणी केली आहे. आता फ्रँचायझी या यादीतून लिलावासाठी खेळाडूंची निवड करतील.
परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ५७ खेळाडू आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील ५२ खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत. यावेळी मिनी लिलावात फारसे खेळाडू खरेदी केले जाणार नाहीत. कारण फक्त ८७ खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये, सचिव जय शाह म्हणाले, “जर प्रत्येक फ्रँचायझीने त्यांच्या संघात जास्तीत जास्त २५ खेळाडूंचा समावेश केला, तर या लिलावात एकूण ८७ खेळाडूंना बोली लागेल.” ज्यामध्ये ३० परदेशी खेळाडू असू शकतात. खेळाडूंच्या यादीमध्ये १८५ कॅप्ड (राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले), ७८६ अनकॅप्ड आणि २० सहयोगी देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. या यादीत ६०४ अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहेत. त्यापैकी ९१ खेळाडू यापूर्वी आयपीएलचा भाग राहिलेले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक ५७ क्रिकेटपटूंचा समावेश –
या मिनी लिलावात २७७ परदेशी खेळाडू सहभागी होणार आहेत. या सर्व खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक ५७ क्रिकेटपटूंचा समावेश असेल. यानंतर दक्षिण आफ्रिकेचे ५२ खेळाडू असतील. तर वेस्ट इंडिजचे ३३, इंग्लंडचे ३१, न्यूझीलंडचे २७, श्रीलंकेचे २३, अफगाणिस्तानचे १४, आयर्लंडचे ८, नेदरलँडचे ७, बांगलादेशचे ६, यूएईचे ६, झिम्बाब्वेचे ६, नामिबियाचे ५ आणि स्कॉटलंडचे २ खेळाडू आहेत.