राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या विवादित वक्तव्यानंतर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण पुन्हा तापले आहे. यावर भाजपचे नेते दुटप्पी भुमिका घेत असल्याने जोपर्यंत राज्यपालांसह इतर नेत्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असून त्यांचे बालपण शिवनेरी किल्ल्यावर गेले असे वक्तव्य आमदार लाड यांनी एक कार्यक्रमा दरम्यान दिले होते.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील आपला संताप व्यक्त करत भाजपला अल्टीमेटम दिला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “प्रसाद लाड यांचे विधान हे बेजबाबदारीचे आहे. “प्रसाद लाड मुर्ख माणूस असून अशा महत्वाच्या पदावरिल लोक छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अशी विधाने कशी काय करू शकतात? एका बाजूला शिवरायांना दैवत मानायचे आणि दुसरीकडे अशी विधाने करायची हा कोणता प्रकार? तुम्हाला समजत नसेल तर बोलू नका.” असे ते म्हणाले. तसेच भाजप ही दुटप्पी भुमिका आहे. भाजप जोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हकालपट्टी करत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी रोखठोक भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.