मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून पक्षबांधणीच्या कामात व्यस्त आहे. मात्र, दुसरीकडे राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. एकाच वेळी मनसेच्या 400 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पुण्यातील मनसेचे आक्रमक नेते वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा आहे. अशात त्यांच्याच समर्थकाने पक्षाला रामराम ठोकला आहे. त्याचबरोबर वसंत मोरे यांना राष्ट्रवादीकडून मोठी ऑफर देखील मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
तब्बल 400 पदाधिकाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा…
मनसेचे माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज होते. त्यामुळे निलेश माझिरे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे.दरम्यान, राज ठाकरे यांच्या आदेशानुसारच निलेश माझिरे यांचा जिल्हाध्यक्षपदावरून पायउतार झाला होता. मनसे नेते शिरीष सावंत यांनी प्रसिद्धपत्रक काढून निलेश माझिरे यांची गच्छंती केली होती.
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून…
निलेश माझिरे यांनी यापूर्वी देखील पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्वतः राज ठाकरे यांनी निलेश माझिरे यांची समजूत काढली होती. आता तर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार निलेश माझिरे यांचा पायउतार करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील माथाडी कामगार महाराष्ट्र निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पद माझिरे यांच्याकडे होते. त्यामुळे माझिरे यांना पदावरून काढून टाकल्यानंतर त्याच्या समर्थकांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
वसंत मोरेंना अजित पवार यांच्याकडून खुली ऑफर
राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणार वसंत मोरे हे देखील मनसेवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर वसंत मोरे यांनी यापूर्वी अनेकदा उघड नाराजी व्यक्त केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिली आहे. एका विवाह सोहळ्यात अजित पवार आणि वसंत मोरे एकत्र आले. यावेळी अजित पवार यांनी वसंत मोरे यांनी ही ऑफर दिल्याचे समजते.