केएमटी प्रशासनाने केंद्र शासनाच्या माध्यमातून 75 डबल डेकर ईलेक्ट्रीक बस मिळण्यासाठीचा प्रस्ताव दिला आहे. या बस कोल्हापुरात आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. 65 सिटर डबलडेकर इलेक्ट्रीक बसचा रविवारी कावळा नाका येथील कार्यालयाच्या परिसरात डेमो घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
केएमटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसची आवश्यकता आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या योजनेतून 75 इलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात, असा प्रस्ताव महापालिकेच्या केएमटी प्रशासनाने खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे दिला आहे. सध्या पुणे, मुंबई, चेन्नई, बेंगलोर या मेट्रो सिटीमध्ये ई बसेसचा वापर केला जात आहे. चेन्नईच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात अशोका लेलॅण्ड आणि स्वीच या कंपनीची 65 सिटर डबलडेकर बस दिली जाणार आहे. मुंबईत तयार झालेली 65 सिटरची ही बस रविवारी कोल्हापूरमार्गे चेन्नईला निघाली होती. कावळा नाका येथील खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयाजवळ ही बस आल्यानंतर खासदार धनंजय महाडिक, माजी महापौर सुनील कदम यांच्यासह परिवहन विभागाच्या अधिकाऱयांनी या इलेक्ट्रीक बसची पाहणी केली.
65 सिटर पूर्ण एसी असलेल्या या डबलमजली बसमध्ये प्रवाशांसाठी विविध अत्याधुनिक सुविधा आहेत. सुरक्षेसाठी या बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. या बसची किंमत सुमारे साडेतीन कोटी रूपये असून, एकवेळ बॅटरी चार्ज केल्यानंतर ही बस 520 किलोमीटर धावते. बॅटरी चार्जंग केवळ एका तासात होते. अशा प्रकारच्या बसेस केएमटीच्या ताफ्यात घेण्यासाठी केंद्र शासनाकडून पाठपुरावा करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर सुनील कदम, सहाय्यक परिवहन अधिकारी मंगेश गुरव, नंदकुमार सावंत, केएमटीचे प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, उत्तम पाटील, इंद्रजित जाधव, जय अकोळकर आदी, उपस्थित होते.
केएमटीचे उत्पन्नात वाढ
केएमटीची आर्थिक घडी विस्कटली असून केंद्र आणि राज्य शासनाच्या विशेष योजनेतून अशा बसेस मिळाल्या तर केएमटीचे आर्थिक उत्पन्न वाढेल. शिवाय रस्त्यावरील वाहतूकीचा ताणही कमी होईल, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. तसेच अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱया भाविकांना पार्किंग स्थळापासून अंबाबाई मंदिरपर्यंत ये-जा करण्यासाठी यातील काही बसेस वापरणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.