कोल्हापूर विमानतळाच्या विकासाचे सर्व प्रश्न गतीने मार्गी लावले जात असून, पुढील दोन आठवडयात कोल्हापूर ते बेंगळूर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती, खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. इंडिगो कंपनीच्यावतीने, कोल्हापूर ते बेंगळूर मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याने, कोल्हापूरच्या व्यापार उद्योग, पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. लवकरच कोल्हापूर- मुंबई विमानसेवा दैनंदिन स्वरूपात सुरू करण्याचा प्रयत्न असून, कोल्हापूरहून अन्य काही महत्वाच्या शहरात विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही खासदार महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासह अन्य विकासासाठी खासदार धनंजय महाडिक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. धावपट्टी विस्तारीकरणासह नाईट लॅण्डिंगचा प्रश्न मार्गी लागला आहे. लवकरच नव्या टर्मिनलची इमारत पूर्ण होणार आहे. यापूर्वी कोल्हापूर ते बेंगलोर या मार्गावर सुरू असलेली विमानसेवा महिन्याभरापासून बंद आहे. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी याप्रश्नी लक्ष घालून प्रयत्न सुरू ठेवले होते. त्याला आता यश मिळाले असून, पुढील दोन आठवडयात पुन्हा एकदा कोल्हापूर ते बेंगळूर विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्समार्फत बेंगळूरची विमानसेवा सुरू होणार असल्याने, कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग आणि पर्यटनाला पुन्हा चालना मिळणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रोज सुरू रहावी, कोल्हापुरातून अन्य काही महत्वाच्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी सुध्दा प्रयत्नशील असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. त्यामुळे नजीकच्या काळात कोल्हापूर विमानतळावरील हवाई वाहतूक वाढेल आणि देशाच्या हवाई नकाशावर कोल्हापूरचे नाव ठळक होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे.