राज्यातील कथित व चर्चेत असणाऱ्या 100 कोटींच्या (आरोपावरून) वसुली प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील आज सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सोमवारी सकाळी 11 वाजता सुनावणी पार पडली असता मुंबई उच्च न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावलर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाल्याने महाविकास आघाडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. पण जामीन मिळाल्यानंतरही देशमुखांना तुर्त दिलासा मिळालेला नाही.
प्राप्त माहीतीनुसार, मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत राहिलेल्या 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणातील आरोपांवरुन 1 वर्षांपेक्षाही जास्त दिवस अनिल देशमुख तुरुंगात होते. आज जामिन मिळाला पण सीबीआयतर्फे सर्वोच्च न्यायालयात या जामीनाला आव्हान देण्यात येणार असल्याने सध्या अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस अनिल देशमुख तुरुंगात राहणार आहेत, अशी माहीती आहे.
दरम्यान, सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाने जामिनावर 10 दिवसांची स्थगिती मान्य केली आहे. या न्यायालयाने जामीन मंजूर करताना स्थगिती कालावधीत देशमुखांचं पासपोर्ट प्रशासनाकडे जमा करणे, पुढील तपासात सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत आठवड्यातून दोन दिवस देशमुखांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी, अशा काही अटींवर जामिन मंजूर केला आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस अनिल देशमुख तुरुंंगातच असणार आहेत.