‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’ अशी म्हण जणू केल्या कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध होत आहे. कारण सरकारी कार्यालयाच्या कित्येक खेट्या आपलं काम असलं की माराव्या लागतात आणि याउलट खाजगी कामे झटपट होत असतात. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त होतात परंतु आता राज्य सरकारने आनंदाची बातमी आणली आहे.
1 जानेवारीपासून ऑनलाईन सेवा..
आता राज्य सरकारने सर्व शासकीय विभागांना सर्व सेवा ऑनलाईन स्वरूपात 1 जानेवारीपासून नागरिकांना उपलब्ध करून देण्याची सक्ती केली आहे. सर्व शासकीय विभागांना मुख्य सचिवांनी यासंबंधी आदेश दिले आहेत. ज्या सेवा ऑनलाइन स्वरूपात देता येणार नाहीत त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे 31 डिसेंबपर्यंत द्यावी लागणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
राज्यातील सर्व नागरिकांना 1 जानेवारीपासून पारदर्शक, वेळेत व कार्यक्षम पद्धतीने सेवा देण्यात याव्या, यासाठी राज्य सरकारने अनेक विभागांना सक्त सूचना दिल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकच नव्हे तर शेतकऱ्यांची कामे लवकर आणि सहज होणार आहेत. कामाच्या वेळी प्रशासनाकडून टाळाटाळ झाल्यास, ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध न करून दिल्यास संबंधित प्रशासकीय कर्मचाऱ्याला व विभागाला जबाबदार धरले जाणार आहे.
जन्म-मृत्यूचा दाखला, नळ, वीजजोडणी, जात प्रमाणपत्र किंवा इतर प्रमाणपत्र, अनेक परवानग्या, मंजुरी यांसारख्या अनेक प्रकारच्या 506 सेवा कालबध्द पद्धतीने नागरिकांना देणे प्रशासनाला बंधनकारक असेल. सध्या प्रशासन देत असलेल्या संपूर्ण 506 सेवांपैकी जवळपास 400 सेवा ऑनलाईन पद्धतीने तर 106 सेवा ऑफलाईन पद्धतीने नागरिकांना दिल्या जातात. पण आता 1 जानेवारी 2023 पासून या संपूर्ण 506 सेवा या ‘ऑनलाईन पद्धतीने’च नागरिकांना दिल्या जाणार आहेत, असा निर्णय घेण्यात आला असून तशा सूचना प्रशासनास दिल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी यांची कामे सहज होणार आहेत.