पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे समृद्धी प्रवासासाठी खुला झाला आहे. त्यामुळे आता या महामार्गावरून बससेवा देखील सुरु होणार आहे.राज्य परिवहन महामंडळाने महत्वाचा निर्णय घेत समृद्धी महामार्गावरून औरंगाबाद ते नागपूर आणि नागपूर ते शीर्डी बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 डिसेंबरपासून ही बससेवा सुरु होणार आहे.
औरंगाबाद ते नागपूर प्रवास सोपा
एसटी महामंडळाने औंगाबादेतील प्रवाशांना कमी वेळात नागपूरला पोहोचवण्यासाठी समृद्धी महामार्गावरून बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 डिसेंबरपासून या महामार्गावरून औरंगाबाद ते नागपूर बससेवा सुरू होणार आहे. मात्र ही बस किती वाजता निघेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबात नियोजन सुरु असल्याची माहिती आधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या औरंगाबाद ते नागपूर प्रवासासाठी एसटीला सुमारे 12 तास लागत होते. मात्र आता समृद्धी महामार्गामुळे ही वेळ कमी होऊन सात ते आठ तासांवर येईल.
नागपूर ते शीर्डी बस धावणार
नागपूरहून शीर्डीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर आता या मार्गावत बससेवा सुरू होमार आहे. राज्य परिवहन महामंडळाने नागपूर ते शिर्डी बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी 15 डिसेंबरपासून ही बस सुरू होणार आहे. गणेशपेठ येथील बसस्थानकावरुन ही बस निघेल आणि ती नॉनस्टॉप शिर्डी गाठेल. ही बस दररोज रात्री नऊ वाजता निघेल आणि सकाळी साडेपाच वाजता शिर्डीत पोहोचेल. तसेच शिर्डीतून रात्री नऊ वाजता निघून सकाळी 5.30 वाजता नागपूरमध्ये पोहोचेल. नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी प्रवाशांना 1300 रुपये भाडे राहील. तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असेल. याशिवाय 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत लागू राहील.
औरंगाबाद ते शिर्डी बसही सुरू होणार
नागपूरसोबत औरंगाबादहून देखील शिर्डीपर्यंत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. कारण समृद्धी महामार्गामुळे अवघ्या एका तासात औरंगाबाद ते शिर्डी प्रवास पूर्ण करता येणार आहे. सध्या औरंगाबादहून शिर्डी जाण्यासाठी प्रवाशांना वैजापूर आणि श्रीरामपूरमार्गे खराब रस्त्यावरून जाताना चार तास लागत होते. आता हा प्रवास एका तासात करता येणार आहे.