मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा हा महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि मित्रपक्षांची बैठक आज झाली. त्यात मोर्चाच्या तयारीसाठी आवश्यक बाबींचा आढावा घेतला गेला. बैठकीनंतर अजित पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
काहीही झाले तरी शनिवार, 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्रद्रोह्यांविरुद्ध महामोर्चा होणारच असा ठाम निर्धार आज महाविकास आघाडीने व्यक्त केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि महाराष्ट्रप्रेमी नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. त्याची जय्यत तयारीही सुरू आहे. सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी, महापुरुषांचा अवमान आणि महाराष्ट्रात येणाऱया व येऊ घातलेल्या प्रकल्पांची पळवापळव अशा विविध मुद्दय़ांसाठी आयोजित या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचा राज्यातील शिंदे-फडणवीस (ईडी) सरकारवर तोफखाना धडाडणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बुधवारी बैठक झाली. त्या बैठकीसंदर्भात प्रसारमाध्यमांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा खरपूस समाचार घेतला. ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले. पण गेले पंधरा दिवस हा प्रश्न चिघळला आहे. मग ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा खुलासा करायला इतके दिवस का लावले? दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यापर्यंत हा खुलासा का थांबला होता?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
पुस्तक न वाचता पुरस्कार कसा देता?
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “एखादी समिती नेमली जाते तेव्हा त्या समितीचा आदर केला पाहिजे. पुस्तक वाचले नाही किंवा पुरस्कार देण्याच्या आधी ही चर्चा होण्याची गरज होती. पुस्तक न वाचता तुम्ही पुरस्कार कसा देतात आणि पुस्तक न वाचता पुरस्कार परत कसा घेऊ शकतात? मुळात त्या पुस्तकात काय आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. निर्णय जाहीर होण्यापूर्वी विचारविनिमय व्हायला पाहिजे. निर्णय झाल्यानं समितीच्या मताचा आदर राखला पाहिजे,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.