छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करा अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. आज महाविकास आघाडीने सरकारविरोधात मुंबईत विराट असा महामोर्चा काढला. यावेळी आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.
महाराष्ट्रातील महापुरुषांच्या कार्याचे देशभरात आदराने स्मरण केले जाते. मात्र, याच महापुरुषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल टिंगलटवाळी करत आहेत. ही टिंगलटवाळी करताना राज्यपालांना शरम वाटली पाहिजे. तसेच शिवाजी महाराज यांचं नावं आज साडे तीनशे वर्ष झाले तरी नावं अखंड आहे. त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, त्यामुळे महाराजांचा अपमान करणाऱ्यांची हकालपट्टी करा अन्यथा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शरद पवारांनी दिला.
मला विधान भवनात जाऊन 55 वर्षे झाली मी शंकरदयाळ शर्मांपासून अनेक राज्यपाल पाहिले. त्या सर्व राज्यपालांनी महाराष्ट्राचा नावलौकीक वाढवला. पण आजचे राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात नेत आहेत असेही शरद पवार म्हणाले.