लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झालाय. मुंबईकडे येणाऱ्या लेनवर हा अपघात झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खोपोलीजवळ बोरघाटात कंटेनरने या खाजगी बसला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात 18 जण जखमी झाले असून मिळालेल्या माहितीनुसार बस चालकाचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. अपघात स्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून मदतीसाठी आयआरबी, देवदूत, महामार्ग पोलिस, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.
अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. अपघातातील 4 गंभीर जखमीना एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तर 6 जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार चालू आहेत. 10 ते 12 किरकोळ जखमींना घटना स्थळावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असल्याने तीनही लेन वरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.