परंडा तालुक्यातील येणेगाव-सावदरवाडी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली होती. परंडा मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास पॅनल गटाचे तीन ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात एकनाथ शिंदे गटाने बाजी मारली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंके यासंदर्भात माहिती दिली. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाने किंबहुना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने बाजी मारली आहे.
येणेगाव-सावदरवाडी येथे रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचा भैरवनाथ ग्रामविकास पॅनल व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या बाणगंगा ग्रामविकास पॅनलमध्ये अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने प्रथमच खाते उघडले आहे. या ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार नाईकनवरे प्रियांका संदीप ३४० मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ७ पैकी ३ जागेवर शिंदे गटांचे सागर शंकर गाढवे, दीपाली शहाजी नाईकनवरे आणि कातुरे श्रीमंत किंचक १३६ मते घेऊन निवडून आल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाणगंगा ग्रामविकास पॅनलने चुरशीची लढत करून ७ पैकी ४ जागेवर मिसाळ दिशा शशीराव १३६ मते, डोंगाळे तुकाराम रामभाऊ १३६ मते, सोनवणे सिताबाई महादेव १७३ मते, सांगोळे राधाबाई गणेश १६५ मते घेऊन विजयी झाले आहेत. यातील दोन जागा प्रथमच बिनविरोध झाली होती.
ग्रामपंचायत निवडणुकीत ७ जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या सरपंच पदाची व तीन जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाणगंगा ग्रामविकास पॅनेलच्या चार जागा ताब्यात गेल्या आहेत. परंडा मतदारसंघातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पहिलाच विजय असल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी जोरदार जल्लोष केला. यापुढे जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने आमचीच असतील, असा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंके यांनी केला आहे. येणेगाव ग्रामपंचायत निवडून देऊन विश्वास व्यक्त करणाऱ्या मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत. दोन्ही गटांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने आपली सत्ता कायम राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर ग्रामपंचायत आपल्याकडे यावी यासाठी बाणगंगा ग्रामविकास पॅनेलने जोरदार मोर्चे बांधणी केली होती. अखेर ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे.