राज्यातील 7682 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज (ता. 20) जाहीर झाले. थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने यंदाच्या निवडणुकीत जोरदार चुरस पाहायला मिळाली. प्रत्येक पक्षाकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात असले, तरी या निवडणुकीत भाजपच ‘नंबर वन’ ठरल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, राज्यातील तब्बल 2023 ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काॅंग्रेसने 1215 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलंय, तर शिवसेनेच्या शिंदे गटाने (772) ठाकरे गटापेक्षा (639) जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. काॅंग्रेसने 861 ग्रामपंचायतीवर विजयाचा दावा केला आहे.
भाजप व शिंदे गटाने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्याचं दिसतंय. भाजप व शिंदे गटाने एकत्रित 2795, तर महाविकास आघाडीने 2750 ठिकाणी विजय मिळवला. इतर आघाड्यांनी 1135 ठिकाणी सत्ता मिळवलीय. राज्यातील 616 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या आहेत.
यंदा जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने मोठी रंगत दिसून आली. सरपंच पदाच्या निवडणुकीत 1873 ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आल्याचे दावा केला आहे. राष्ट्रवादीचे 1007, शिंदे गटाने 709, तर ठाकरे गटाचे 571 ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. काँग्रेसचे 657 ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. इतर पक्ष व अपक्षांनी 967 ठिकाणी विजय मिळवलाय.
महत्वाची आकडेवारी
एकूण ग्रामपंचायती – 7,682
एकूण सदस्य संख्या- 65,916 (पैकी बिनविरोध सदस्य- 14,028).
सरपंचपदांच्या एकूण जागा- 7,619 (बिनविरोध सरपंच- 699).
63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज नाही.
‘नोटा’ प्रथम क्रमांकावर
कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कांगणी येथील प्रभाग दोनमध्ये ‘नोटा’ला सर्वाधिक (285) मते मिळाली. त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमानुसार दोन नंबरची मतं घेणाऱ्या उमेदवार शीतल कोरे (279) यांनी विजयी घोषित केले. मात्र, या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
पुण्यातील भोर तालुक्यातील म्हाकोशी येथे असाच प्रकार समोर आलाय. म्हाकोशी येथील प्रभाग एकमध्ये नोटाला 104, तर दुसऱ्या क्रमांकावरील रेखा साळेकर यांना 43 मते मिळाली. नियमानुसार साळेकर यांना विजयी घोषीत करण्यात आले.