माजी विद्यार्थ्याकडून आज शिक्षकावर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला. हा प्रकार कोल्हापुरातील कदमवाडी परिसरातील ‘माझी शाळा’ या ठिकाणी घडला. या हल्ल्यात संजय सुतार रा. वरणगे पाडळी हे शिक्षक गंभीर जखमी झालेत. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी शिक्षकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शाहुपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर माजी विद्यार्थ्यांचा तपास सुरु आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लहान भावाला शाळेत शिक्षकाने काही कारणास्तव ओरडल्याने दुखी झालेल्या मोठ्या भावाने थेट शिक्षकावरच कोयत्याने वार केलेत. मानेवर, पोटात, छातीवर आणि पाठीवर असे अंदाजे आठ वार चिडलेल्या भावाने केलेत. यात शिक्षक संजय कृष्णा सुतार रा. वरणगे-पाडळी हे जखमी झाले असून अत्यावस्थेत आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत. ही घटना कोल्हापूर शहरातील कदमवाडी परिसरात घडली. हल्लेखोराने आपल्या मित्राच्या साथीने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर मुख्य संशयितांचा शोध सुरु आहे.