सरवडे येथील संदिप संजय सुतार (वय १४) या शाळकरी मुलाचा काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. हि घटना रविवारी दुपारी सरवडे – उंदरवाडी गावच्या हद्दीतील कालव्यात घडली. त्याचा मृतदेह आज सोमवारी पहाटे आढळून आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे. हरहुन्नरी स्वभावाच्या संदिपच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संदिप हा फोंडा गावचा असून सरवडे येथे निवृती सुतार यांच्याकडे आजोळी राहत होता. तो येथील शिवाजीराव खोराटे विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकत होता.काल रविवारी सुट्टी असल्याने तो मित्रांसमवेत डोंगराच्या भैरीला दर्शनासाठी गेला होता. मित्रांनी मिळून जेवण देखील केले होते. जेवल्यानंतर परत येत असताना दुधगंगा उजव्या कालव्यात तो अंघोळीसाठी उतरला त्याला पोहता येत नसल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जावून बुडाला. तो बुडाल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यानंतर सर्वांनी गावाकडे धाव घेतली व नातेवाईकांना कल्पना दिली.
नातेवाईक व गावातील युवकांनी तात्काळ धाव घेऊन त्याचा कालव्यात शोध घेतला परंतु तो सापडला नाही. काव्याला पाणी जास्त असल्यामुळे शोध घेणे अवघड बनले. त्यानंतर धरण अधिकाऱ्यांना कळवून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले.कालव्यातील पाणी पूर्ण बंद झाल्यानंतर आज पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला. . मृतदेहाची सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. सरवडे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.