उत्तर भारतात थंडीने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
जानेवारीत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. शहरातील तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
संपूर्ण डिसेंबर महिन्यात कधी थंडी तर कधी गर्मी असे वातावरण पाहायला मिळाले. विदर्भात पारा 10 अंशांपर्यंत खाली आला होता. अलिकडील काळात मात्र थंडी गायब झाली होती. आता जानेवारी महिन्यात थंडी पुन्हा एकदा परतणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
देशात अनेक राज्यांतील शाळांमध्ये हिवाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, हरयाणा, राजस्थानमधील शाळांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतील सर्व सरकारी शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद राहतील. मात्र, या काळात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्ग सुरू राहणार आहेत.