कोल्हापूर -गगनबावडा रस्त्यावर बालिंगे पुलानजीक अनैतिक संबंधाच्या संशयावरून ऊसतोड महिलेचा पतीकडून डोक्यात दगड घालून पत्नीचा निर्घृण खून करण्यात आला. स्नेहल नितीन अहिवळे (खडकी ता. मंगळवेढा, सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळ आणि करवीर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की नितीन दगडू अहिवळे हे आपली पत्नी स्नेहल यांच्यासह गुरुदत्त शुगर वर्क्स टाकळीवाडी येथे ऊस तोडणीचे काम करतात.आपल्या पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय नितीन याच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्याने सोमवारी रात्री आपल्या पत्नी स्नेहल यांना फिरायला जाण्याच्या निमित्ताने कोल्हापूर -गगनबावडा राज्यरस्त्यावरील बालिंगे पुलाजवळ घेऊन आला.पुलाशेजारी असणाऱ्या सहदेव बाबुराव जांभळे (बालिंगे) यांच्या नदीकाठच्या उसाच्या प्लॉटमध्ये त्याने तिला बोलण्यात गुंतवून शेजारी असणारा बांधावरील मोठा दगड उचलून त्याने आपल्या पत्नीच्या डोक्यात घातला.तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी नितीन आज सकाळी साडेसातच्या सुमारास पहिल्यांदा लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गेला.घटनेचे गांभीर्य ओळखून लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला करवीर पोलीस मध्ये पाठवले.
करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी पाटील यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक काळे,पोलीस उपनिरीक्षक निवास पवार, विक्रांत चव्हाण, रवी पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर त्यांनी याबाबत संबंधित महिलेच्या नातेवाईकांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी भेट दिली. क्राइम ब्रँचचे सुभाष सरवडेकर,विजय तळसकर, सुजय दळवी, अमोल चव्हाण, योगेश शिंदे यांनी भेट दिली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.