सीमा सुरक्षा दल (BSF) ही भारतीय लष्करातील महत्त्वपूर्ण संस्था आहे. नुकतीच या दलाच्या महासंचालनालयद्वारे १२८४ कॉन्स्टेबल्सच्या (ट्रेडसमन) रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याची घोषणा केली.
https://rectt.bsf.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. विशेष म्हणजे यामध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही उमेदवारांची भरती केली जाणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सीमा सुरक्षा दलाद्वारे या भरतीसंबंधित जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या.
सीमा सुरक्षा दलाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जाहिरात पत्रक प्रकाशित झाल्यापासून म्हणजेच २५ फेब्रुवारीपासून ते पुढील ३० दिवसांपर्यंत उमेदवार कॉन्स्टेबल्सच्या रिक्त जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. २७ मार्च ही अर्ज करायची अंतिम तारीख आहे. त्यानंतर पुढील निवड प्रक्रियेला सुरुवात होईल. उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील वेबसाइटवर उपलब्ध आहे.
BSF मध्ये कॉन्स्टेबल्सच्या १२८४ रिक्त जागांपैकी १२०० जागा या पुरुष उमेदवारांसाठी, ६४ जागा या महिला उमेदवारांसाठी आणि उरलेल्या जागा या अन्य उमेदवारांसाठी असणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक आणि शारीरिक पात्रतेविषयीची एकूण माहिती तपशीलवार https://rectt.bsf.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर आहे. अर्ज करण्याआधी तेथे ‘व्ह्यू डिटेल्स’ या ऑप्शनवर क्लिक केल्यावर संपूर्ण माहिती मिळेल.