Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रगडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास यापुढे होणार तुरुंगवास : सुधीर मुनगंटीवार

गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास यापुढे होणार तुरुंगवास : सुधीर मुनगंटीवार

गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास यापुढे कठोर कारवाई होणार आहे. महाराष्ट्राचे वैभव असणार्‍या गडकिल्ल्यांवर मद्यपान करणार्‍यांना किमान तीन महिने तुरुंगवास आणि 10 हजार रुपये दंड आकारला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. यासंदर्भातील प्रस्ताव राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यातील गडकिल्ल्यांचे संरक्षण, जतन, संवर्धनाचा मुद्दा विधानसभेचे सदस्य संग्राम थोपटे, अशोक चव्हाण, भीमराव तापकीर आदींनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. त्यावर बोलतना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात 387 संरक्षित स्मारके आहेत. मागील सरकारच्या काळात या स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्षच झाले होते. निधीदेखील पुरेसा दिला जात नव्हता. आता मात्र जिल्हा नियोजनपैकी सुमारे 513 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. 75 स्मारकांच्या ठिकाणी जनसुविधा निर्माण करण्याचे कार्यही हाती घेण्यात आले असून त्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. सर्व 387 स्मारकांवर त्यांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किल्ल्यांवरील अतिक्रमणेही दूर करण्यात येत आहेत, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

कारवाईसाठी हेरिटेज मार्शल

गडकिल्ल्यांवर मद्यपान करण्याचे प्रकार उघडकीस येत असतात. राज्य सरकार असे प्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार आहे. अशा मद्यपींवर कारवाई करण्यासाठी हेरिटेज मार्शल नेमण्यात येतील, असे सांगतानाच जे स्वयंसेवक असे प्रकार उघडकीस आणतील त्यांना दंडाच्या पन्नास टक्के रक्कम बक्षिस म्हणून देण्याचेही प्रस्तावित असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

रायगड किल्ला राज्याकडे देण्यासाठी केंद्राला विनंती

रायगड किल्ला हा केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. त्यामुळे तिथे विविध परवानग्या मिळविण्यात अडचणी येतात. त्यासाठी हा किल्ला किमान पाच वर्षांसाठी तरी डिनोटिफाय करावा, अशी विनंती आपण केंद्र सरकारला केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही आपण या संदर्भात संपर्क साधून विनंती करू, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -