”माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यावर प्रेम कर, माझ्याशी लवशिप कर. नाहीतर तुला व तुझ्या घरच्या लोकांना जिवंत सोडणार नाही,” असा मोबाईलवर मेसेज पाठवणाऱ्या युवकाने त्याच्या नातेवाईकांसमवेत शालेय मुलीच्या घरात घुसून तिच्या पालकांना बेदम मारहाण केली. शहराजवळील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शंतनू निगडे (वय २२) अल्पवयीन शालेय मुलीचा सातत्याने पाठलाग करत होता. ती परीक्षेला जात असताना दुचाकीवरून तिच्या मागे जायचा. त्याने मुलीला मोबाईलवर मेसेज पाठवून तिच्या कुटुंबीयांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. मुलीने मेसेजची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याची विचारणा त्याच्याकडे केली. त्यानंतर संशयिताने नातेवाईकांसमवेत मुलीच्या घरात घुसून मारहाण केली.
याप्रकरणी शंतनू सर्जेराव निगडे, शहाजी रामचंद्र निगडे, सोहम शहाजी निगडे, संगीता शहाजी निगडे, अजिंक्य निगडे, सर्जेराव रामचंद्र निगडे, किरण दिवाकर निगडे, शोभा सर्जेराव निगडे, रेखा दिनकर निगडे, अनुराधा निगडे यांच्यावर बेकायदेशीर एकजमाव करून घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.