आयपीएल 16 व्या मोसमाला 31 मार्च रोजी धडाक्यात सुरुवात झाली. कोरोनाचा धोका टळल्याने यंदा अनेक वर्षांनी रंगारंग सामन्याचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकरांनी परफॉर्मन्स सादर केला. या रंगारंग कार्यक्रमासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाख पेक्षा अधिक चाहत्यांनी उपस्थिती लावली होती. गुजरातने चेन्नईवर सलामीच्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानात 5 विकेट्स मात करत विजयी सलामी केली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरातने विजयी सुरुवात केली. मात्र हार्दिकने केलेल्या एका कृतीमुळे नेटकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला आहे.
नक्की काय झालं?
या ओपनिंग सेरेमनीच्या शेवटी गुजरात आणि चेन्नई या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मंचावर बोलवण्यात आलं. धोनी हार्दिकच्या आधीच मंचावर होता. त्यानंतर हार्दिक मंचावर आला. तेव्हा मंचावर एका रांगेत धोनी, बीसीसीआयचे अरुण धुमळ, बीसीसीआय सचिव जय शाह, अध्यक्ष रॉजर बिनी, रश्मिका मंधाना, तमन्ना भाटीया आणि अर्जित सिंह उभे होते. हार्दिक मंचावर हातात ट्रॉफी घेऊन आला. पंड्याने हातातून ट्रॉफी ठेवली. त्यानंतर धोनीसोबत हस्तांदोलन न करता धुमळ यांच्यापासून हस्तांदोलन करण्यास सुरुवात केली.
हार्दिकने केलेल्या या कृतीमागे काही नियम आहे की आणखी काही, हे अजूनही स्पष्ट नाही. मात्र हार्दिकने धोनीसोबत असं वागल्याने नेटकऱ्यांचा मात्र संताप झाला आहे. हार्दिकच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याला कर्णधार असल्याचा माज चढलाय, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
हार्दिकने मैदानात असं करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी हार्दिकने विराट कोहली याच्यासोबत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही असंच काहीसं केलं होतं.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा 17 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात हार्दिक रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचं नेतृत्व करत होता. या सामन्यादरम्यान हार्दिकने विराटकडे अशाच प्रकारे दुर्लक्ष केल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून करण्यात आला होता.
पहिल्या सामन्याचा धावता आढावा
दरम्यान 16 व्या मोसमातील सलामीच्या सामन्यात गुजरातने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऋतुराज गायकवाड याने केलेल्या 92 धावांच्या जोरावर चेन्नईने गुजरातला विजयासाठी 179 रन्सचं टार्गेट दिलं. गुजरातने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वात जास्त 63 धावा केल्या. तर राहुल तेवतिया आणि राशिद खान या जोडीने अखेरच्या क्षणी काही फटके मारत गुजरातला विजय मिळवून दिला.