देशात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येने चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रातही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने सरकारी आणि निम सरकारी कार्यालये, कॉलेज आणि बँकांमधील कर्मचाऱ्यांना मास्क बंधनकारक केलं आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी याबाबतचा आदेश दिला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तात्काळ हा आदेश लागू केला आहे. त्यांनी लोकांना आवाहन केलं की, आठवडा बाजार, बस स्टँड, यात्रा, लग्नसमारंभ आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा.
सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता राखा असंही त्यांनी म्हटलंय. प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटलंय की, कोरोना आणि इन्फ्लुएन्झाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सरकारी आणि निम सरकारी कार्यालये, कॉलेज आणि बँकांमधील कर्मचाऱ्यांना मास्क बंधनकारक केला आहे.
नागिरकांनीही मास्कचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय. महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे नवे २४८ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८१ लाख ४५ हजार ५९० इतकी झालीय. सध्या राज्यातील सक्रीय रुग्ण संख्या ३ हजार ५३२ इतकी आहे.