भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी TATA मोटर्सने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. 1 मे 2023 पासून कंपनीने आपल्या गाड्यांच्या किमतीत 0.6 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामध्ये अल्ट्रोज, टियागो, हॅरियर, नेक्सॉन, पंच, नेक्सॉन ईव्ही, सफारी इत्यादी मॉडेल्सचा समावेश आहे. यापूर्वी टाटाने फेब्रुवारीमध्ये सुद्धा गाड्यांच्या किंमतीत 1.2 टक्क्यांनी वाढ केली होती. म्हणेजच या वर्षात दुसऱ्यांदा टाटाच्या गाड्या महाग होणार आहेत.
नियामक बदलांमुळे वाढलेला खर्च आणि एकूण इनपुट खर्चात झालेली वाढ या कारणामुळे गाड्यांच्या किंमतीत दरवाढ करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या वाढलेल्या खर्चाचा काही भाग कंपनी उचलत आहे. मात्र आता कंपनीला वाढलेल्या किमतीचा काही बोजा ग्राहकांवर टाकण्याची मजबुरी आहे. टाटा व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांनी सुद्धा त्यांच्या गाड्यांच्या किमती आतापर्यंत दोनदा वाढवल्या आहेत.
1 एप्रिलपासून देशभरात बीएस 6 फेज 2 मानके लागू करण्यात आली आहेत. त्यामुळे देशातील सर्वच कार उत्पादक कंपन्यांना त्यांच्या कारमध्ये अशी उपकरणे बसवावी लागतील, जेणेकरून कारमुळे किती प्रदूषण होत आहे हे आपल्याला समजणार आहे. हे उपकरण बसवायला लागल्यामुळे आपोआपच गाड्यांच्या किमतीवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे हा आर्थिक भार कंपन्या ग्राहकांवर टाकत आहेत.
दरम्यान, टाटा मोटर्स या वर्षी आपल्या कार आणि एसयूव्ही लाइन-अपमध्ये अनेक सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. यंदा टाटाच्या अनेक गाड्या लॉन्च होणार आहेत. यामध्ये हॅरियरचे फेसलिफ्टेड व्हर्जन, Altroz चे नवीन रेसर व्हर्जन, तसेच सफारी आणि नेक्सॉन यांचा समावेश आहे. याशिवाय, टाटा पंच iCNG व्हर्जन सुद्धा बाजारात येणार आहे.