चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामना म्हणजे धावांची बरसात होती. चेन्नईने दोन अर्धशतकांच्या जोरावर २२६ धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. पण फॅफ ड्युप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तुफानी फटकेबाजी केली. त्यामुळे सामन्यात रंगत आली आणि ही लढत चांगलीच अटीतटीची झाली. पण या धावांच्या मॅरेथॉनमध्ये अखेर चेन्नईने आरसीबीवर आठ धावांनी मात केली.
चेन्नईच्या २२७ धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण पहिल्याच षटकात कोहली बोल्ड झाला. त्यानंतर महिपालच्या रुपात आरसीबीला दुसरा धक्का बसला. पण त्यानंतर मैदानात वादळी फटकेबाजी सुरु झाली. ग्लेन मॅक्सवेलने २४ चेंडूंत धडाकेबाज अर्धशतक झळकावले. त्याला दुसऱ्या टोकाकडून फॅफची चांगली साथ मिळत होती. फॅफनेही त्यानंतर आपले वादळी शतक पूर्ण केले. पण यावेळी मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात ग्लेन मॅक्सवेल ७६ धावांवर आऊट झाला. त्यानंतर फॅफही जास्त काळ मैदानात टिकला नाही. यावेळी फॅफ ड्युप्लेसिस ६२ धावांवर आऊट झाला.चेन्नईला सुरुवातीलाच ऋतुराज गायकवाडच्या रुपात मोठा धक्का बसला. पण चेन्नईचा संघ थांबला नाही. ऋतुराज बाद झाला तरी त्यानंतर अजिंक्य नावाचे वादळ मैदानात घोंघावले. अजिंक्यची फलंदाजी यावेळी नजरेचे पारणे फेडणारी होती.
अजिंक्य हा जास्त काळ खेळपट्टीवर टिकला नाही, पण त्याचे फटके हे चेन्नईच्या संघाचे प्लॅनिंग नेमके काय आहे, हे सांगणारे होते. आरसीबीसाठी वेन पार्नेल हा मॅचविनर गोलंदाज होता. पण अजिंक्यने त्याच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर त्याने विजयकुमार वैशाखलाही सोडले नाही. एकामागून एक फटाक्यांची माळ अजिंक्यने लावली. अजिंक्यने २० चेंडूंत ३७ धावा केल्या. पण त्याच्या या धावा सर्वांच्या लक्षात राहिल्या. त्यानंतर डेव्हॉन कॉनवेने धडाकेबाज फटकेबाजी केली. कॉनवेचे शतक होईल असे वाटत होते, पण त्याला शतकापासून वंचित राहावे लागले. कॉनवेने ४५ चेंडूंत ८३ धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबेनेही दमदार फटकेबाजी केली. शिवमने यावेळी २७ चेंडूंत ५२ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच चेन्नईच्या संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला. अंबाती रायडू व मोईन अली यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत धावसंख्या २२६ पर्यंत नेली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध आयपीएल २०२३च्या २४व्या सामन्यात युवा खेळाडूला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून मैदानावर आणले. तो खेळाडू इतर कुणी नसून आकाश सिंग आहे. या वेगवान गोलंदाजाने त्याच्या पहिल्याच षटकात चेन्नई संघासाठी मोठी कामगिरी केली. त्याने विराटला त्रिफळाचीत बाद केले. त्यामुळे आता हा खेळाडू नेमका आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ही घटना बेंगलोरच्या डावातील पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर घडली. विराट कोहली याने पुढे येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटची कड घेत त्याच्या बुटाला लागला. त्यानंतर चेंडू त्याच्या पुढच्या आणि मागच्या पायाला लागत स्टंपला जाऊन लागला. कदाचित आतापर्यंत कोणताही खेळाडू अशाप्रकारे बाद झाला नसेल.