उचगाव ता. करवीर येथे कृषी महाविद्यालयाच्या परिसरात गणेश नामदेव संकपाळ ( वय ४० रा. गणेश कॉलनी उचगाव) याचा निर्घुण खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार करून सिमेंटच्या पाईपचा तुकडा डोक्यात घालून हा खून करण्यात आला. पानपट्टीच्या पैशाच्या उधारीवरून संकपाळ याचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गणेश संकपाळ व त्याचे मित्र रात्री कृषी महाविद्यालयातील महाविद्यालयाच्या आवारात जेवायला बसले होते. यावेळी पानपट्टीच्या दोनशे रुपयांच्या उधारीवरून त्यांच्यात वाद झाला.वादाचे पर्यावसान खूनात झाले. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे ,पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात,मोहन गवळी, बजरंग हेब्बाळकर, आकाश पाटील,राजू नाईक,विराज डांगे, सुदर्शनी व गांधीनगर पोलिस यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविली. अवघ्या काही तासात पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.