‘मिसरूड’ देखील न फुटलेल्या पोरांच्या कंबरेला कोयते दिसत आहेत. नवनवीन गुन्हेगार रेकॉर्ड वर येत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी या गुन्ह्यांची मालिकाच सुरू आहे. टोळीयुद्ध… हे सांगलीकरांना नवीन राहिलेले नाही. एकमेकांचा बदला घेण्यासाठी काही टोळ्या सुडाने पेटल्या आहेत. आठवड्याभरात सांगलीत तिघांचा मुडदा पडला. तडीपार गुंड पुन्हा येथे आश्रयाला येऊन गुन्हेगारी कारवाया करीत असल्याने शहरात ‘गुंडाराज’ असल्याचे गुन्हेगारीवरून दिसून येते.
गेल्या आठवड्यात वानलेसवाडी येथे महिलेचा घरात घुसून कोयता व सत्तूरने सपासप वार करून खून झाला. ही घटना ताजी असतानाच माधवनगर रस्त्यावर साखर
कारखान्याच्या गेटमध्ये महाविद्यालयीन युवकाचा कोयत्याचा हल्ला करून मुडदा पाडण्यात आला. दोनच दिवसांपूर्वी कुपवाड येथे बामणोली गावच्या कमानीजवळ तडीपार गुंडाचा खून करण्यात आला. तसेच मालमत्तेवरुन सख्ख्या भावाचा खुन झाला. वानलेसवाडीत महिलेच्या खुनात तीन अल्पवयीन मुले सापडली.
तसेच कारखान्या जवळ झालेल्या खुनात १९ वयोगटातील पाच हल्लेखोरांना अटक झाली. सहा महिन्यापूर्वी माधवनगर ते पद्माळे फाट्यावर एका महाविद्यालयीन युवकाचा खून झाला होता. यामध्ये १९ वयोगटातील तीन पोरं सापडली. कोवळ्या वयात पोरांची पावले गुन्हेगारीकडे वळू लागल्याने हा एक चिंतेचा विषय बनला आहे. गांजा व नशेच्या गोळ्यांचे सेवन करून कोणताही गुन्हा करण्यास ही पोरं मागे-पुढे पाहत नसल्याचे घटनांवरून दिसून येते.
‘मॉर्निंग वॉक’ व बाजारात निघालेल्या महिलांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून पळविले जात आहेत. शेतात काम करणाऱ्या महिला ‘टार्गेट’ करून शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील दागिने लंपास केले जात आहेत. मध्यवर्ती बसस्थानकावर महिलांच्या टोळ्या सक्रिय आहेत. वाहनातून पेट्रोल व डिझेल चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे अनेक नवनवीन गुन्हेगार रेकॉर्डवर येत आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सांगलीचे कारागृह ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे. साडेचारशेहून अधिक कच्चे कैदी आहेत. बहुतांश हे कैदी खून व खुनी हल्ल्याच्या घटनांमधील आहेत.