Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रात घातक शस्त्रास्त्रांचा खुला बाजार !

कोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रात घातक शस्त्रास्त्रांचा खुला बाजार !

मुंबई, पुण्यासह आंतरराज्य कुख्यात शस्त्रास्त्र तस्करी टोळ्यांनी कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात जीवघेण्या शस्त्रास्त्रांचा खुलेआम बाजार मांडला आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात 2021- 2022 व जानेवारी ते एप्रिल 2023 या काळात 325 पेक्षा जादा गुन्ह्यांत 355 पिस्तूल, रिव्हॉल्व्हरसह तब्बल 650 जिवंत काडतुसांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. गावठी, विदेशी बनावटीच्या शस्त्रांची तस्करी रोखण्याऐवजी त्याचा खुलेआम बाजार मांडला जाऊ लागला आहे. भविष्यात शस्त्रांच्या बळावर फोफावणारी गुन्हेगारी सामान्यांच्या मुळावर उठू शकेल, यात शंका नाही. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीचा टक्का कमालीचा वाढला आहे. क्षुल्लक कारणातून उद्भवलेल्या वादातही नंग्या तलवारी चकाकू लागल्या आहेत. जांबिया, कोयत्यासह धारदार शस्त्रांचा वापर होऊ लागला आहे. एव्हाना गावठी, विदेशी बनावटीच्या घातक शस्त्रांच्या बळावर दहशत माजविण्याचा प्रकार वाढीला लागला आहे.

पुण्यापाठोपाठ सांगली, सातारा, कोल्हापुरात तस्करी

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह परिक्षेत्रात 2021- 2022 व जानेवारी ते एप्रिल या काळात 355 शस्त्रांसह 650 पेक्षा अधिक काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. त्यात एकूण 325 गुन्ह्यांत कोल्हापूरमध्ये 50, सांगलीत 58, सातारमध्ये 57, सोलापूर ग्रामीणमध्ये 20, पुणे ग्रामीणमध्ये 170 अशी एकूण 355 शस्त्रे (weapons) हस्तगत करण्यात आली आहेत. कोल्हापूर आणि सांगलीतून 108 शस्त्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

कोवळ्या मुलांकडे घातक शस्त्रे

शहरासह ग्रामीण भागात पंधरवड्यात झालेल्या अनेक हाणामारीच्या गुन्ह्यात घातक शस्त्रांचा वापर झाल्याचे चित्र आहे. कोवळ्या वयातील मुलांच्या हातातही घातक शस्त्रे दिसू लागली आहेत. त्यात अमली पदार्थांच्या व्यसनात गुरफटलेल्या मुलांकडून दहशतीसाठी गावठी, विदेशी बनावटीच्या घातक शस्त्रांचाही वापर होऊ लागला आहे.

भरचौकात गोळ्या घालून थरार

गुन्हेगारी टोळ्यांकडून जीवघेण्या शस्त्रांचा होणारा वापर डोकेदु:खी आणि चिंता वाढविणारा असतानाच सांगलीत रविवारी पहाटे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 7 गावठी पिस्तूल, 17 काडतुसे, 280 नशेच्या गोळ्यांसह गांजासाठा हस्तगत करून पोलिसांनी 7 गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शस्त्रांस्त्र तस्करी काही नवी नाही. यापूर्वीही संघटित टोळ्यांच्या म्होरक्याकडून शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. अनेक म्होरके शस्त्रांचे बळी ठरले आहेत. अगदी भरचौकात गोळ्या घालून थरार माजविण्यात आल्याच्या ठळक घटना आहेत.

शस्त्रास्त्रांसह अमली तस्करीतही अव्वल

शस्त्र तस्करीही अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातही कोल्हापूर परिक्षेत्राचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांत अमली तस्करीप्रकरणी 373 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये कोल्हापुरातील 70, सांगलीतील 86, सातारामधील 50, सोलापूर ग्रामीणमधील 110, पुणे ग्रामीणमधील 27 गुन्ह्यांचा समावेश आहे. 2021 मध्ये 207, तर 2022 मध्ये 166 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.

अत्याधुनिक शस्त्रांचा 50 हजारांत सौदा

मुंबई, पुण्यासह औरंगाबाद येथील अनेक कुख्यात टोळ्यांच्या म्होरक्यांचे बिहार, उत्तर प्रदेश, आंध्रसह दिल्लीतील बड्या शस्त्र तस्करांशी थेट लागेबांधे आहेत. या साखळीतून अत्याधुनिक हत्यारांची उलाढाल होत आहे. 50 ते 55 हजारांत शस्त्रांचा सौदा होतो. जिल्ह्यातील अनेक नामचीन गुंडांची पोलिसांनी झाडाझडती घेतल्यास शस्त्रांचे मोठे घबाडच हाताला लागेल; पण मानसिकता हवी ना!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -