Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरबाप रे....! 16 महिन्यात जिल्ह्यातून 356 युवती बेपत्ता !

बाप रे….! 16 महिन्यात जिल्ह्यातून 356 युवती बेपत्ता !

लग्नाचे आमिष, प्रेमाच्या भूलभुलय्यात ओढून, अल्पवयीन युवतींचे अपहरण करून लैंगिक शोषणाचा फंडा शहरासह जिल्ह्यात वाढू लागला आहे. गतवर्षात 265 तर जानेवारी ते एप्रिल 2023 चार महिन्यांत 91 अशा एकूण 356 युवती बेपत्ता झाल्या आहेत.असहायतेचा फायदा घेत बहुतांशी युवती लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या आहेत. 15 ते 22 वयोगटात हे प्रमाण सर्वाधिक आहे. अपहरणांसह लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटना माणुसकीला काळीमा फासणार्‍या आहेत.

गतवर्षासह चालू आर्थिक वर्षात अल्पवयीन युवतीसह महिलांच्या बेपत्ता होण्याची जाहीर झालेली आकडेवारी काळजाचा ठोका वाढविणारी आहे. एक जानेवारी ते मार्च 2023 या तीन महिन्यांच्या काळात राज्यात पाच हजार 610 युवती बेपत्ता झाल्या आहेत. मार्च 2023 महिन्यात हे प्रमाण दोन हजार दोनशेवर आहे. फेब्रुवारी 2023 महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 390 ने अधिक आहे.

पालकांना टेन्शन!

राज्यात युवतीसह महिलांच्या बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक आहे. शिवाय सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारी आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातही त्याचे लोण वाढत आहे. एक जानेवारी ते डिसेंबर 2022 या काळात जिल्ह्यातून तब्बल 265 मुली बेपत्ता झाल्या होत्या. कालांतराने त्यापैकी 242 युवतींचा छडा लावण्यात यश आले. त्यानंतरही हे प्रमाण वाढतच राहिले आहे.

चार महिन्यांत 91 बेपत्ता

जानेवारी ते एप्रिल 2023 चार महिन्याच्या काळात बेपत्ता झालेल्या अल्पवयीन युवतीसह विवाहित महिलांची आकडेवारी पुढीलप्रमाणे (कंसात छडा लागलेल्यांची संख्या) : जानेवारी : 22 (17), फेब्रुवारी : 15 (9), मार्च : 30 (22), एप्रिल : 24 (17).

लैंगिक अत्याचाराचा वाढता टक्का

फसगत झालेल्या बहुतांशी युवती साधारणत: 16 ते 20 या वयोगटातील आहेत. लग्नाचे आमिष, प्रेमाच्या भूलभुलय्यात अडकवून, नोकरीची भुरळ घालून फसगत करण्यात आलेली आहे. युवतींच्या भोळ्या भाबड्या स्वभावाचा फायदा घेत एव्हाना बळजबरी करून लैंगिक शोषणाच्या घटनांचाही टक्का वाढू लागला आहे.

दुर्दैवी युवतींनी संपविली जीवनयात्रा !

लग्नाचे आमिष अन् प्रेमाच्या भूलभुलय्यात फसगत झालेल्या सीमावर्ती भागातील तीन अल्पवयीन युवतींनी कीटकनाशक प्राशन करून आणि एका युवतीने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविली आहे. जानेवारी व फेब-ुवारी 2023 या घटना घडल्या आहेत. अलीकडच्या काळात 17 ते 25 वयोगटात कीटकनाशक औषध प्राशन करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शासकीय रुग्णालयात किमान सात ते आठ घटनांची नोंद होत असते. त्यामध्ये युवती, महिलांचे तीन ते चार इतके प्रमाण असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -