Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरडेस्टिनेशन कोल्हापूर चे ब्रँडिंग करा : सतेज पाटील

डेस्टिनेशन कोल्हापूर चे ब्रँडिंग करा : सतेज पाटील



जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी प्रत्येकाने डेस्टिनेशन कोल्हापूर चे ब्रॅंडिंग करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. जिल्ह्यात पर्यटनाचा विकास योग्य प्रकारे केला तर कोल्हापूर पर्यटनात देेशातील नंबर एकचा जिल्हा होईल, असा विश्‍वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी व्यक्‍त केला.


जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने जिल्ह्यात पर्यटन सप्ताह आयोजित केला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळी आयोजित कार्यक्रमात या सप्ताहाचे उद्घाटन झाले. येत्या पाच वर्षांत पर्यटनातून जिल्ह्याची समांतर अर्थव्यवस्था उभी राहिली पाहिजे. डेस्टिनेशन कोल्हापूर हा ब्रॅंड जागतिक स्तरावर पोहोचावा यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिली.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरला खर्‍या अर्थाने समर्थ आणि समृद्ध जिल्हा बनवला. राजर्षी शाहूंच्या कार्याची माहिती जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांना करून द्यावी. जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळांची माहिती योग्य प्रकारे करून देणे आवश्यक आहे.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यात पर्यटनात प्रचंड संधी आहे. जिल्ह्यातील पर्यटनाचे ब—ँडिंग करून मोठ्या प्रमाणावर पर्यटक यावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक नागरिक, प्रशासन व खासगी उद्योजक व्यावसायिकांनी प्रत्येक ठिकाणी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ हा ब—ँड वापरावा. मोठ्या प्रमाणावर ब—ँडिंग होऊन पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत. कोल्हापूरची खाद्यसंस्कृती ही प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुढील काळात जिल्ह्याची ओळख ही महाराष्ट्राची ‘फूड कॅपिटल’ अशी झाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.
पर्यटनामधून अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. पर्यटनातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करू, असेही त्यांनी सांगितले. पर्यटन दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाने पर्यटन जनजागृती सप्ताह हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार व त्यांच्या सहकार्‍यांचे त्यांनी अभिनंदन केले.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, जिल्ह्यात पर्यटनाला मोठ्या संधी आहेत. पर्यटनात नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्यास मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील. प्रास्ताविकात जिल्ह्याचे सर्वसमावेशक पर्यटन धोरण ठरविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते ‘कोल्हापूर डेस्टिनेशन’ या लोगोचे, पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ‘कोल्हापूर टूरिझम’ लोगो आणि पर्यटन संकेेतस्थळाचे (वेबसाईट), खा. माने यांच्या हस्ते ‘कोल्हापूर फेस्टिव्हल कॅलेंडरचे तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते कोल्हापूर टूरिझम मॅपचे अनावरण झाले. जिल्ह्यातील विविध वैशिष्ट्ये असलेल्या ‘स्टँडी’चे यावेळी अनावरणही करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आमदार सर्वश्री ऋतुराज पाटील, राजेश पाटील, जयंत आसगावकर, चंद्रकांत जाधव, महापालिका आयुक्‍त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पर्यटन विभागाचे दीपक हरणे आदी उपस्थित होते. हॉटेल चालक मालक संघटनेचे उज्ज्वल नागेशकर यांनी आभार मानले.

’डेस्टिनेशन कोल्हापूर’ लोगोत शाहूंचे हस्ताक्षर

’डेस्टिनेशन कोल्हापूर कोल्हापूर टूरिझम’ या लोगोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ताक्षरातील इंग्रजी व मराठीतील कोल्हापूर या नावाचा वापर करण्यात आला आहे. या लोगोचे प्रत्येकाने ब्रँडिंग करावे, या लोगोचे डीपी लावावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -