Saturday, February 24, 2024
Homeब्रेकिंगदर्शना पवारचं चारित्र्यहनन बंद करा!; निकटवर्तीयाची पोस्ट व्हायरल

दर्शना पवारचं चारित्र्यहनन बंद करा!; निकटवर्तीयाची पोस्ट व्हायरल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पुण्यामधील दर्शना पवार हत्याकांडाचा आरोपी राहुल हांडोरेला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. सध्या राहुल हा पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. असं असतानाच दर्शनासंदर्भातील उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. मात्र याच चर्चा आणि लेख पाहून दर्शनाला ओळखणाऱ्या एका जवळच्या व्यक्तीने सोशल मीडियावर तिच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत एक आवाहन केलं आहे.

तिला आई-वडीलांची चिंता होती
वारकरी दर्पणचे संपादक सचिन पवार यांनी ही पोस्ट लिहिली आहे. “कुमारी दर्शनाच्या हत्याकांडाने पुरता हादरून गेलो आहे. त्या सोबतच दर्शनाविषयी समाजमाध्यमांवर अनेक लोक जसे व्यक्त होत आहेत हे तिच्यावर अन्याय करणारे आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो ती संवेदनशील होती, हूशार आणि समजदारही होती. घरची जाण होती. आई-वडीलांची चिंता होती. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते तिला. ती भक्कम व कणखर होती,” असं सचिन पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, “अधिकारी होण्याअगोदचा तिचा मला पाठवलेल्या मेलचा स्क्रिनशाॅट सोबत जोडतो आहे. त्यावरून ती कसा विचार करत होती ते पहा,” असंही सचिन पवार यांनी म्हटलं असून या मेलमध्ये दर्शनाने सचिन यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केल्याचं दिसून येत आहे.

तिला माझ्याकडून देखणा विठोबा हक्काने हवा होता
“निवड झाल्यावर तिला माझ्याकडून देखणा विठोबा हक्काने हवा होता. रोज ज्ञानेश्वरी वाचायची,” असंही सचिन पवार यांनी म्हटलं आहे. तसेच घडलेल्या प्रसंगाबद्दल बोलताना सचिन पवार यांनी, “त्या दिवशी ती मित्रासोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेली व तिथं घात झाला. तिचं ट्रेकींगला जाणं चुकीचं नाही. मित्रासोबत जाणं हे ही चुकीचं नाही. त्यानं तिला लग्नाची मागणी घालणं हे ही चुकीचं नाही. इथपर्यंत कोणताही गुन्हा नाही. राहूलचं प्रेम एकतर्फी होतं. दर्शनाने नकार दिल्यावर राहूल मधला नराधम जागा झाला आणि त्यानं तिचा जीव घेतला. हा राहुलचा गुन्हा आहे. यात दर्शनाचा काय गुन्हा?” असा प्रश्न विचारला आहे.

गलिच्छ पोस्ट वाचल्यावर तिटकारा आला”आपण सर्वांनी तिला अप्रत्यक्ष गुन्हेगार ठरवणं, संस्काराच्या नावाखाली चारित्र्यहनन करणं बंद केलं पाहिजे. पुरूषी मानसिकतेतील गलिच्छ पोस्ट वाचल्यावर तिटकारा आला. बाईकडे आपण अधिक विवेकाने, समतेनं पहाण्याचं शिक्षण घ्यायची गरज आहे,” असं पोस्टच्या शेवटी सचिन पवार यांनी म्हटलं आहे. तसेच पोस्टचा शेवट त्यांनी, “दर्शनाला भावपूर्ण श्रद्धांजली,” असं म्हणत केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -