महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाला गेल्या एक-दोन दिवसांपासून सुरूवात झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे नदीवेस परिसरातील सारण गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर पसरू लागले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्यावतीने पावसाळ्यापूर्वी केलेली कामे उघडी पडली आहेत. सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्य खात्याने तात्काळ या भागातील गटारी साफ करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मरगूबाई मंदिर ते नदीवेस नाका परिसरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोठ्या सारण गटारी बांधल्या आहेत. मात्र त्या सारण गटारीची साफसफाई वेळच्यावेळी केली जात नाही. त्यामुळे वारंवार गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत आहे. वारंवार तक्रार करूनही आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भागातील नागरिकांतून केला जात आहे. पूर भागातील तसेच सारण गटारी पावसाळ्यामध्ये तुंबू नयेत यासाठी पावसाळ्यापुर्वीच सारण गटारींची स्वच्छता केला असल्याचा दावा आरोग्य खात्याकडून करण्यात आला आहे.
मात्र पावसाळा सुरू होऊन एक-दोन दिवस उलटण्या अगोदरच नदीवेस परिसरातील गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याचे उघड झाले. सांडपाण्याबरोबर मोठ्याप्रमाणात कचरा, प्लास्टीक, इतर कचरा इतरत्र पसरून दुर्गंधी पसरत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.