खासदार शरद पवार यांच्या प्रगल्भ विचारांतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आहे. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी शरद पवार यांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. पक्ष स्थापनेपासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. काहीजणांनी शरद पवार यांची साथ सोडली असली तरी इचलकरंजी विधानसभा परिक्षेत्रात आम्ही शरद पवार यांच्या पाठीशीच ठामपणे राहणार असल्याची माहिती माजी आमदार अशोकराव जांभळे, प्रांतिक सदस्य मदन कारंडे आणि शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय महानाट्यानंतर इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीची भूमिका काय असणार या संदर्भात राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत आला होता. दोन दिवसांपासून स्थानिक पातळीवरसुध्दा याबाबत नेतेमंडळींच्यात चर्चा सुरु होत्या. अखेर मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक होऊन त्यामध्ये सर्वानुमते राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याच पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार हसन मुश्रीफ हे आमचे नेते असले तरी पक्ष म्हणून आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगत मदन कारंडे यांनी, शहराच्या विकासकामांसाठी अजितदादा आणि आमदार मुश्रीफ यांची साथ घेणार असल्याचे सांगितले. तर बाप हा बापच असतो असे सांगत माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचा आपला निर्धार व्यक्त केला.
बैठकीला नितीन जांभळे, अब्राहम आवळे, उदयसिंग पाटील, लतिफ गैबान, अभिजित रवंदे, श्रीकांत कांबळे, परवेझ गैबान, अमर कोरोचीकर, सौ. माधुरी चव्हाण आदी उपस्थित होते.इचलकरंजीत मुळातच शरद पवार यांचे नेतृत्व मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या वर्षभरात इचलकरंजी शहरात निरीक्षक म्हणून नियुक्त झाल्यानंतर माजी आम. अशोक जांभळे, मदन कारंडे व माजी आम राजीव आवळे, नितीन जांभळे, अध्यक्ष विठ्ठल चोपडे व सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी संघटन बळकट केले आहे. सध्या इचलकरंजी येथे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी पक्ष असुन शरद पवार व जयंत पाटील यांचे नेतृत्वात सर्व सामन्य जनतेच्या विश्वासास पात्र होऊन महापलिकेवर व विधानसभेत झेंडा फडकवेल, अशी मला आशा आहे. शरद पवार यांचेसोबत रहाण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो नक्कीच योग्य आहे, अशी प्रतिक्रिया पक्ष निरिक्षक अविनाश चोथे यांनी व्यक्त केली.