राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी मुंबईत मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेण्यात गडबड केली का? असा प्रश्न कार्यकर्त्यातून उपस्थित केला जात आहे.
इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी बैठक घेऊन शरद पवार ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्यासोबत जाण्याचे स्पष्ट केले होते. मात्र जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन जनतेची कामे करुन घेणार असल्याचे नमूद केले होते, असे सांगताना अजित पवार यांचा फोटो मात्र काढून टाकत नवीन शरद पवारांचा फोटो लावण्यात आला.
शरद पवार यांना पाठिंबा देणाऱ्यामध्ये माजी आमदार अशोकराव जांभळे, मदन कारंडे, विठ्ठल चोपडे आणि माजी आमदार राजीव आवळे आदींचा समावेश होता. इचलकरंजीतील राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच गटांनी शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अचानक पाठिंबा दिला.
राजकारणातील चाणक्य आणि मुरब्बी असलेल्या शरद पवार यांचाच हा राजकीय डाव असल्याची चर्चा होती. मात्र बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी दोन वेगवेगळे मेळावे घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार यांनी आपण सत्तेत कसे आलो हे सांगत असताना शरद पवार यांनी आपल्या आयुष्यात राजकारण कसे केले याचा पाढाच वाचला. भाजपसोबत जाताना प्रत्येकवेळी वेगळी भूमिका शरद पवारांनी कशी घेतली याचे विवेचन त्यांनी केले. जर शरद पवार सभा घेत असतील तर प्रति सभा घेण्याशिवाय आपल्याला पर्याय नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवारांच्या भाषणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खरी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आणि शरद पवार यांची राजकीय खेळी नसल्याचेही सिद्ध झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सर्वच नेत्यांची वेगळी आणि मोठी ताकद आपापल्या भागात आहे. प्रत्येक भागात वेगळी ताकद असल्याने हे नेते कधीही कोणताही निर्णय घेऊ शकतात. या नेत्यांना एकसंघ बांधून ठेवण्याची जबाबदारी आता वरिष्ठ नेत्यांच्यावर आली आहे. जर सर्वांना एकसंघ बांधून ठेवले तरच घेतलेला निर्णय कायमस्वरूपी राहू शकतो. आता सर्वांना एकसंघ बांधून ठेवण्याची जबाबदारी कोण घेतात हे पाहणे उचित ठरणार आहे.
अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे विविध विकास कामानिमित्त इचलकरंजीतील नेते मंडळी वारंवार भेटण्यासाठी जात असतात. अशा परिस्थितीत मंगळवारी घेतलेला निर्णय योग्य आहे का ? अशी चर्चा दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. शरद पवार यांची राजकीय खेळी आहे असे समजून जर निर्णय घेतलेला असेल तर अजित पवार यांच्या बुधवारी झालेल्या भाषणानंतर इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता निर्णय घेतो ते पहावे लागेल. जर गडबडीत निर्णय घेतला असेल आणि काही कार्यकर्ते, नेते या निर्णयावर नाराज असतील तर निर्णय बदलण्याचा धाडस पाऊल उचलणार का ते बघावे लागेल.