महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची गुरूवारी सामना कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर लगेच संजय राऊत हे उध्दव ठाकरेंकडे मातोश्रीवर तर अभिजीत पानसे राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर गेले. त्यामुळे मनसेने अभिजित पानसे यांच्यातर्फे ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली. दोघांमध्ये सामना कार्यालयात ठाकरे बंधू एकत्र येणार
पंधरा मिनिटे चर्चा झाली.
त्यापूर्वी दोघांनी भांडूप ते सामना कार्यालयातपर्यंत एकत्र कारने जवळपास सव्वा तास प्रवास केला. म्हणजेच या दोन्ही नेत्यांमध्ये आज जवळपास दीड तास चर्चा झाली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, अभिजित पानसे यांनी मनसेचा युतीचा प्रस्ताव संजय राऊत यांना दिला, अशी चर्चा आता रंगली आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजित पानसे यांनी युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चा | फेटाळून लावल्या आहेत. अभिजित पानसे म्हणाले, मी संजय राऊत यांना युतीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मी फार छोटा माणूस आहे. राज व उध्दव ठाकरेंनी एकत्र यायचे की नाही, याचा निर्णय दोघांनीच घ्यायचा आहे. पक्षात माझ्याहून अनेक वरिष्ठ नेते आहेत. तसा काही प्रस्ताव असलाच तर पक्षातील वरिष्ठ नेते यावर चर्चा करतील.
संजय राऊत यांची व माझी जुनी ओळख आहे. अनेक दिवसांपासून त्यांची भेट झाली नव्हती. तसेच, माझे काही खासगी काम होते. या कामांसाठीच संजय राऊत यांची भेट घेतली. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही आपण असा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे प्रतिनिधींना सांगितले आहे. दरम्यान, राज्यात सध्या विचित्र युती, आघाडी पहायला मिळत आहेत. या राजकारणाचा भाग नसलेला मनसे हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्राने राज ठाकरेंच्या पाठिशी उभे रहायला हवे असे पानसे म्हणाले. संजय राऊत यांच्यासोबत जुने संबंध आहेत. त्यांच्यासोबत झालेली चर्चा राजकीय स्वरुपाची नाही. ती केवळ वैयक्तिक स्वरुपाची होती, असे पानसे म्हणाले. ठाकरे सिनेमाच्या दुसऱ्या भागाबद्दल चर्चा झाली का, या प्रश्नावरही त्यांनी मौन बाळगले.