जुलै महिना पावसाचा असणार आहे. राज्यात आता पुढील १२ दिवस पाऊस कायम असणार आहे. हवामान विभागाने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट दिले आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात चांगली वाढ होणार आहे. कोकणात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
कोकणातील अन् विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच खान्देश, मध्य महाराष्ट्रासह १० जिल्ह्यांत आणि मराठवाड्यामधील ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. राज्यात आता २७ जुलैपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यांना ?
१८ जुलै : रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली
१९ आणि २० जुलै : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
२१ जुलै : रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली
रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भागात पुढील पाच दिवस वाऱ्यांचा वेग जास्त राहणार आहे. आषाढातील अमवास्येचे दुसऱ्या दिवशी समुद्राला उधाण आले होते.
विदर्भात पाऊस सुरु आहे. गोंदिया जिल्ह्यातील दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. रात्री पुन्हा जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग झाली. मंगळवार सकाळपासूनच गडचिरोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील कामांना वेग आलाय. गोसेखुर्द धरण अन् चिंचडोह बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील वैनगंगा तसेच प्राणहिता नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुणे शहरासाठी पावसाची प्रतिक्षा संपणार आहे. पुणे शहराला यलो अलर्ट दिला आहे. यामुळे पुणे शहरांमधील धरणांमध्ये जलसाठ्यात वाढ होणार आहे. यंदा पुणे शहरातील पावसाने अजून सरासरी गाठली नाही.
मुंबई पूर्व उपनगरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर या परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.