विक्रीसाठी आणलेला १४ लाख ६५ हजाराचा ८६ किलो गांजा उमदी पोलीसांनी स्विप्ट मोटारीचा पाठलाग करून पकडला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून गांजा पुरवठादार व खरेदीदारांसह पाच जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आंध्र प्रदेशातून स्विप्ट डिझायर मोटारीतून (एमएच १३ एझेड १३७१) गांजा विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती उमदी पोलीसांना मिळाली. या माहितीनुसार अमोघसिध्द मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर सहायक निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने सापळा लावला.
यावेळी मोटारीच्या डिकीमधून एक पोते काढून घेत असताना इफतेखारूल उर्फ अरबाज बाबासाहेब शेख (वय २६ रा.राजूनगर, जुना कुपवाड रोड) याला ताब्यात घेण्यात आले. याचवेळी मोटारीत समोर बसलेल्या दोघांनी मोटारीसह सोलापूर महामार्गावरून चडचणच्या दिशेने पलायन केले. ही मोटारी इचगाव पथकर नाक्यावर अडवून झडती घेतली असता यामध्ये पोत्यामध्ये भरण्यात आलेला सुका गांजा आढळला.
त्याचे वजन ८६ किलो ३०५ ग्रॅम असून त्याचे मूल्य १४ लाख ६७ हजार ८३५ रु. आहे. मोटारीतून पलायनाच्या प्रयत्नात असलेले प्रतिक कांबळे (वय २६ रा. नागराळे, ता. पलूस) आणि मोहसीन मेहबूब कागजी (वय २८ रा. शंभरफुटी सांगली) आणि शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे.गांजा विक्रीसाठी आंध्रप्रदेशातून प्रकाश भाई (रा. राजमंद्री, आंध्र प्रदेश) याच्याकडून आणण्यात आला असल्याचे अटक केलेल्या तिघांनी सांगितले. तर गांजाची खरेदी करणारा पिंटू माळी हा सांगलीचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीसांनी अटक करण्यात आलेल्या तिघासह पाच जणाविरूध्द उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उमदी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंंदे, उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, शिरीष शिंदे, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, नितीन पलुसकर, आप्पासाहेब हाके, महादेव मडसनाळ, मनिष कुमरे, इंद्रजित गोदे, सोमनाथ पोटभरे, अमोल पाटील, सोपान भंडे, वहिदा मुजावर, समिक्षा म्हेत्रे आदींनी केली.