गेल्या महिन्यात संपूर्ण आटलेला कळंबा तलाव शनिवारी तुडुंब भरला. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच तलाव भरून ओसंडून वाहू लागल्याने बघ्यांची गर्दी झाली. कळंबा तलाव 1883 मध्ये बांधला आहे. तलावाचा जलाशय 93.13 हेक्टरमध्ये आहे. पाणी साठवण क्षमता 2.758 टी.एम.सी. इतकी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा तलाव कोल्हापूरकरांची तहान भागवत आहे.गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरकरांच्या उरात धडकी भरवणार्या पंचगंगेच्या पुराला आता उतार सुरू झाला आहे.
शनिवारी पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत घट सुरू झाली आहे. 41.4 फुटांपर्यंत गेलेली पातळी रात्री 40 फुटांपर्यंत खाली आली. जिल्ह्यातील आणखी 18 बंधार्यांवरील पाणी ओसरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. कोल्हापूर शहरातील काही भागांना पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव आणि कडवी धरण शनिवारी पूर्ण क्षमतेने भरले. राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे.