एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानचा हॉकी संघ मंगळवारी वाघा बॉर्डरवरून भारतात पोहोचला. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ९ ऑगस्टला पाकिस्तानचा भारताशी सामना होणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा चेन्नई येथे ३ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
पाकिस्तान संघ वाघा बॉर्डरमार्गे अमृतसरला जाईल आणि तेथून चेन्नईला रवाना होईल. पाकिस्तान संघासोबत तीन अधिकारी आहेत ज्यात शाहनाज शेख यांचाही समावेश आहे, ज्यांची नुकतीच संघाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शाहनाज यांची पाकिस्तान हॉकी फेडरेशनने जुलैच्या सुरुवातीला पाकिस्तान हॉकी संघाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.
शाहनाज २०१४ मध्ये पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक होते. तेव्हा भारतात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तान संघ ३ ऑगस्टपासून मलेशियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पाकिस्तानला लीगमध्ये ५ सामने खेळायचे आहेत. त्याचबरोबर साखळीतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला भारताचा सामना करावा लागणार आहे. ९ ऑगस्टला पाकिस्तानला भारताशी सामना करायचा आहे. तर पाकिस्तानचा दुसरा सामना ४ ऑगस्टला कोरियाशी आणि ६ ऑगस्टला जपानशी होणार आहे. तर ७ ऑगस्टला त्याची चीनशी टक्कर होणार आहे.
त्याचवेळी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघही मंगळवारी सकाळी चेन्नईला पोहोचला. चेन्नईत पोहोचल्यानंतर भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले. भारतीय संघ ३ ऑगस्टला चीनविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्याआधी बुधवारी संघ सराव करेल. २०१६ पासून दर दोन वर्षांनी याचे आयोजन केले जाते. २०२० मध्ये ते कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले, म्हणून २०२१ मध्ये आयोजित केले गेले. भारत आणि पाकिस्तान हे या स्पर्धेतील यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी ३-३ वेळा ट्रॉफीवर कब्जा केला आहे.