जिल्ह्यात गतवर्षी जुलै महिन्यात १९७.९० मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. यंदा जून महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जून महिन्यातही पावसाने सरासरी गाठली नसल्याचे चित्र होते.जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात पाऊसच पडला नाही. यंदा जुलै महिन्यात १७२.२० पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या जुलै महिन्यापेक्षा यंदाच्या जुलै महिन्यात २५.७० मिलीमीटरने पाऊस कमी झाला आहे.
जिल्ह्यात पावसाची तिन्हीही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे जून महिन्यात पावसाने सरासरीही गाठली नाही. परिमाणी शेतकरी हवालदिल झाला होता. खरीप हंगामातील पेरण्याही रखडल्या होत्या.
शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत होता. जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांत अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पिकांना काही अंशी नवसंजीवनी मिळाली. तर जत आणि तासगाव तालुक्यात अपेक्षित पाऊस झालाच नाही. त्यामुळे बळीराजाला पावसाची प्रतीक्षा कायम होती.जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हलका पाऊस सुरू झाला. त्यानंतर सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली. कधी जोरदार, तर कधी मध्यम पाऊस पडत होता.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा पावसाने जोर धरला. शिराळा तालुक्यात संततधार पाऊस पडला. वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज, या तालुक्यांत जोरदार, तर तासगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात हलका पाऊस झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जुलै २५ मिमीने पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे.