शाळकरी मुलांच्यातील वादाचे पर्यावसान पालकांमध्ये वादात होऊन झालेल्या झटापटीत सद्दाम सत्तार शेख (वय २७ रा. स्वामी मळा) या पालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शब्बीर अब्दुल गवंडी (वय २९ रा. हनुमाननगर), सलमा अमिन आलासे (वय २५ रा. स्वामी मळा) या दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. दरम्यान, झटापटीत कॉलर धरल्याने श्वास गुदमरुन सद्दाम शेख याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले असल्याची माहिती पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी दिली.
येथील स्वामी मळा साई मंदिर परिसरातील सद्दाम शेख याच्या मुलास शब्बीर गवंडी याची बहिणी सलमा आलासे याच्या मुलाने मारहाण केली होती. या कारणावरुन शेख याने आलासे याच्या मुलास कानफटीत मारले होते. भाच्याला झालेल्या मारहाणीबद्दल गवंडी याने शेख याला जाब विचारला असता दोघांच्यात वाद झाला. त्यातूनच झालेल्या झटापटीत शेख हा अचानकपणे जमीनीवर कोसळला. शेख याला नातेवाईकांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतू त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना गुरुवारी प्राप्त झाला. कॉलर धरल्याने श्वास गुदमरुन शेख याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिस निरिक्षक ताशिलदार यांनी सांगितले. त्यामुळे गवंडी व आलासे या भाऊ व बहिणीवर खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, खूनाच्या या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू पोलिसांनी वेळीत धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.