१५ ऑगस्ट रोजी देश ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीत देखील आज स्वतंत्र्यदिनी होणाऱ्या परेडचा आज सराव करण्यात आला. आज १३ ऑगस्ट रोजी ही स्वतंत्र्यता दिन समारोह पथसंचलनाची ‘फुल ड्रेस रिहर्सल’ करण्यात आली. या परेडचे व्हिडीओ समोर आले आहेत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर भव्य सोहळ्यासाठी भारतीय जनता सज्ज झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज लाल किल्ल्यावर सशस्त्र दल आणि विविध तुकड्यांची फुल ड्रेस रिहर्सल पार पडली. आजच्या फुल ड्रेस रिहर्सलमध्ये मिलिटरी बँड, नौदल आणि हवाई दलाच्या तुकड्यांसह विविध तुकड्या सहभागी झाल्या होत्या. ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
केंद्र सरकारचे विविध विभाग, राज्य सरकारे आणि देशभरातील नागरी संस्थांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी एकूण १८०० हून अधिक लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ५० नर्स आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी, सरपंच, शिक्षक, मच्छीमार अशा विविध क्षेत्रातील मान्यवर देखील या कर्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.