पट्टण कोडोली मागच्या वीस वर्षांत कबड्डीमध्ये जिल्ह्यातच नाहीतर राज्यभरात गाजत आहे. या टीमचा एक सदस्य कबड्डीपटू फिरोज डिगावडे यांचे कोरोनाने निधन झालं. प्रचंड मेहनत करत त्यांनी पट्टण कोडोलीत कबड्डी संघ तयार केला. याच जोरावर गावचं नाव जिल्ह्यात केलं.
दरम्यान चांदी उद्योजक कबड्डीपटू फिरोज मुल्ला (डिगावडे) यांचं कोरोनाने निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली. फिरोज भैय्यांच्या तालमीत तयार झालेला आणि सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सूरज रोंगेने त्यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.
एक आठवडा झाला. जीवन-मरणाची रेषा शिवताना शर्थीचे प्रयत्न केले. निकराची झुंज दिली. पण, कोरोना विषाणूची मजबूत पकड भैय्याला भेदता आली नाही. यावेळी ही मॅच कोरोनाने जिंकली. आपला लाडका फिरोज भैय्या हरला.
आपली पोरं देशासाठी खेळायला पाहिजेत…
व्यवसायाने चांदी कारागीर असणाऱ्या भैय्याची ‘कब्बडीपटू’ हीच आयडेंटी कायम राहिली. आपली पोरं शालेय, कुमार, तालुका, स्टेट-नॅशनलसोबतच प्रो-कबड्डी आणि देशासाठी खेळायला पाहिजेत, अशी फिरोज भैयाची इच्छा होती.
आम्ही आवड म्हणून खेळलो; आताच्या नव्या पोरांनी करिअर घडवायला म्हणून खेळांकडे वळायला हवं. आर्मी, रेल्वे, पोलीस, आयकरमध्ये स्पोर्ट कोट्यातून नोकरीच्या संधी असतात. त्याचा उपयोग करून घ्यावा, अशी भैय्याची अगदी प्रामाणिक भावना होती. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.
यातूनच अलीकडच्या तीन-चार वर्षात आपल्या जोडीदारांसोबत मुलींची कबड्डी टीम तयार केली. त्यांना अनुभवाच्या आधारे योग्य आणि अचूक प्रशिक्षण दिलं. आज कोल्हापूरचं नाव या पोरी राज्यात नव्हे तर देशात गाजवत असताना आपण सगळे बघत आहोत. ही यशोपताका आणखी फडकत असताना फिरोज भैय्या आपल्यात असणार नाही, ही गोष्ट अत्यंत दुःखद आहे.
अहंकाराचा लवलेशही नव्हता….
फिरोज भैय्या म्हणजे एकदम दिलखुलास माणूस. त्याच्याठायी अहंकाराचा लवलेशही नव्हता. म्हणून तर लहानथोर अगदी कुणीही असो, त्यांना “ए फिरोज भैय्या” म्हणून हाक मारू शकत असे. कुमार वयात पैलवानकी केलेल्या भैय्याची तब्येत कायम दणदणीत राहिली.
प्रत्येकाची विचारपूस आणि चेष्टामस्करी करत, जागोजागी स्टॉप घेत सकाळी घर ते कंपनी हे फक्त २०० मीटर जायला भैय्याला अर्धा तास लागे. कायम हसत मज्जा करत असणारा, या जगातला सगळ्यात टेन्शन फ्री माणूस म्हणजे फिरोज भैय्या होता.