अल्प मुदतीत दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचा फरार एजंट आशिष बाबासाहेब गावडे (वय 40, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) याला जेरबंद केले. आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी पुणे येथे ही कारवाई केली.
संशयिताला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास 25 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच कंपनीचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदारसह त्याचे अन्य संचालक व एजंट पोलिसांना चकवा देत फरार झाले होते. या काळात संशयित गावडे त्यांच्या संपर्कात राहून त्यांना मदत करीत होता, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत निष्पन्न झाली होती.
तपास अधिकारी स्वाती गायकवाड, उपनिरीक्षक दिलीप कारंडे, हवालदार राजू वरक यांच्या पथकाने मोबाईल लोकेशनद्वारे संशयिताचा छडा लावला. पुणे येथून त्यास ताब्यात घेण्यात आले. गावडे हा लोहितसिंग सुभेदार याचा विश्वासू साथीदार म्हणून ओळखला जातो.
गावडे याच्यावरील कारवाईमुळे फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्यांची संख्या सहा झाली आहे. यापुर्वी विक्रम जोतिराम नाळे, सुवर्णा श्रीरंग सरनाईक, बाळासाहेब कृष्णात धनगर, बाबासाहेब भूपाल धनगर, श्रुतिका सावेकर, अमित शिंदे यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. न्यायालयाने संशयिताला 25 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.