बोरवडे (ता. कागल) येथे काल पायी निघालेल्या वृद्धेला तोंडात बोळा कोंबून शेतात फरफटत नेत सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने हिसकावून नेले. हा प्रकार काल दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. वृध्दा व अनोळखी लुटारू यांच्या झटापटीत शेतात पडलेले एक तोळा दागिने सापडले आहेत.
बोरवडे येथील म्हसोबा मंदिराजवळ गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विजयमाला पांडुरंग वारके (वय ७१, मूळ गाव बोरवडे, सध्या रा. कोल्हापूर) असे वृद्ध महिलेचे नाव आहे.याबाबत मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोल्हापुरात राहणाऱ्या विजयमाला आपल्या मूळ बोरवडे गावी घरगुती कार्यक्रमानिमित्त येत होत्या. बिद्री बसस्थानकावर उतरल्यानंतर त्या बोरवडेकडे पायी चालत निघाल्या.
गावापासून हाकेच्या अंतरावर पाठीमागून आलेल्या अनोळखी लुटारूने त्यांचे तोंड दाबून शेजारील उसात त्यांना फरफटत नेले.त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला असता, लुटारूने त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. लुटारूने वारके यांच्या हातातील दोन पाटल्या व एक बिल्वर ओरबडून घेतले. गळ्यातील मोठ्या मण्यांची एक व बारीक मण्यांची एक अशा दोन माळा हिसकावून घेतल्या. नंतर त्याने उसातून पोबारा केला.
प्रकाराने भेदरलेल्या वारके यांनी मुख्य रस्त्यावर येत आरडाओरडा केला; परंतु तोपर्यंत लुटारू पसार झाला होता. याची माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने लुटारूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो सापडला नाही. पोलिस निरीक्षक गजानन सरगर तपास करत आहेत. दरम्यान, रात्री उशिरा पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपासाबाबत सूचना दिल्या.वर्दळीच्या रस्त्यावर प्रकारबोरवडे ते बिद्री कारखाना या मार्गावर अनेक लोकांची ये-जा सुरू असते. वर्दळ आणि वाहतुकीने मार्ग नेहमीच गजबजलेला असतो. त्याच रस्त्यावरच हा प्रकार झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.