चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट इस्रो सेंटरमध्ये येऊन शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांच्या मेहनतीचं कौतुक केलं. तुमचं यश प्रेरणादायी आहे. तुम्ही अनेक पिढ्यांवर छाप सोडली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. संपूर्ण देशवासियांचा ऊर भरून येईल आणि सर्वांनाच अभिमान वाटेल अशा या तीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी या घोषणा करताच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी टेबल वाजवून त्यांचं जोरदार स्वागत केलं.
तुम्ही साधना केली आहे. तुम्ही जे काम केलंय, तुमचा जो प्रवास घडलाय, तुमचा जो संघर्ष आहे तो एवढा सोपा नव्हता. देशातील जनतेला त्याची माहिती व्हायला हवी. मून लँडरची सॉफ्ट लँडिंग व्हावी म्हणून आपल्या शास्त्रज्ञांनी याच सेंटरमध्ये आर्टिफिशियल चंद्र तयार केला. तिथे असंख्य प्रयोग केले. अनेक टेस्ट केल्या. आता एवढ्या परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला यश मिळणारच ना? असं सांगतानाच या यशानंतर भारताच्या तरुण पिढीत उत्साह संचारला आहे. विज्ञान, अंतराळ आणि नव्याचा ध्यास याबाबत तरुणांमध्ये अत्यंत उत्साह वाढला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पहिली घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून सातत्याने शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच शास्त्रज्ञांनी कशी कशी मेहनत घेतली याचे दाखले दिले. यावेळी पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली. चंद्रयान -3 चंद्राचं रहस्य उलगडणार आहे. त्याच बरोबर पृथ्वीवर येणाऱ्या समस्याही सोडवणार आहे. या यशासाठी मी आपल्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन करत आहे. स्पेस मिशनच्या टच डाऊनला नाव देण्याची परंपरा आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. चंद्राच्या ज्या भागावर विक्रम लँडर उतरलं त्या भागाचं नामकरण करण्यात येणार आहे. त्या ठिकाणाला (पॉइंट) शिवशक्ती हे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा मोदी यांनी केली.
दुसरी घोषणा
पहिली घोषणा केल्यानंतर मोदी यांनी लगेच दुसरी घोषणा केली. बऱ्याच दिवसांपासून एक नामकरण करायचं राहिलं आहे. चार वर्षापूर्वी चंद्रयान -2 चंद्राजवळ पोहोचलं होतं. चंद्रयान-2 ज्या ठिकाणी पोहोचलं त्या ठिकाणाचंही नामकरण करण्याचं ठरलं होतं. पण चांद्रयान -3 यशस्वी झाल्यानंतरच चंद्रयान मिशनच्या दोन्ही ठिकाणांचं नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हर घर तिरंगा आहे. प्रत्येक मन तिरंगा आहे. चंद्रावरही तिरंगा आहे. त्यामुळे चंद्रयान-2शी संबंधित जागेला तिरंगा नावाशिवाय दुसरं काय नाव असू शकतं? चंद्रयान-2ने चंद्राच्या ज्या पॉइंटवर गेलं होतं. त्या पॉइंटला तिरंगा हे नाव दिलं जाणार आहे, अशी घोषणाही मोदी यांनी केली.
तिसरी मोठी घोषणा
23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. याच दिवशी आपलं मून मिशन पूर्ण झालं. आपण चंद्रावर पोहोचलो. सॉफ्ट लँडिग झालं. आपण जगात आपला दबदबा निर्माण केला. त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणजे नॅशनल स्पेस डे म्हमून साजरा केला जाईल. त्या दिवशी देशभर जल्लोष केला जाईल आणि हा दिवस आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील, असं मोदी म्हणाले.