ताजी बातमी ऑनलाईन टीम
गणेश उत्सवात डीजेच्या आवाजाची मर्यादा राखत, नियमांचे पालन करून आपल्या आनंदाने इतरांना त्रास होणार नाही. उत्सव काळात वर्गणी बाबत देखील सतर्कता घेणे गरजेचे आहे. या सर्व बाबींची खबरदारी घेत सर्वांनी मिळून हा गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्याचे आवाहन, शाहूवाडी पन्हाळ्याचे पोलीस उपअधीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी शाहूवाडी येथे तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्यां बैठकी प्रसंगी केले.
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या समवेत शाहूवाडी पोलीस ठाणे यांच्या वतीने शाहूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आमले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जयकुमार सूर्यवंशी म्हणाले, ज्या पद्धतीने आपण घरगुती गणपतीची सेवा करतो आणि काळजी घेतो त्याच पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात खबरदारी घेणे गरजेचे आहे.उत्सवाला गालबोट लागता कामा नये, एक गाव एक गणपती ही सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे.अशा गावांना पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष पारितोषक देखील देण्यात येईल.आपल्या उत्साहाचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पावित्र्य जपत सामाजिक उपक्रम राबवत गणेश उत्सव साजरा करा, असेही ते म्हणाले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे म्हणाले की, उत्सव काळात शांततेचा भंग होणार नाही.कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच प्रशासनाने दिलेल्या नियमाला बांधील राहूनच मंडळाने गणेशोत्सव साजरा करायचा आहे. परवाना असण हे देखील अतिशय महत्त्वाच आहे.मूर्तीची उंची मंडप आणि मूर्तीच संरक्षण, विद्युत पुरवठा यासाठी देखील मंडळांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. लेजर शो चा वापर केल्यास कारवाई होणारच यासाठी मात्र मंडळाने दक्षता घेणे गरजेचे आहे.प्रशासनाच्या सूचनेचे योग्य पालन करून गणेशोत्सव साजरा करा, पोलीस प्रशासनाच्या वतीने आपणाला सहकार्य राहीलच. असेही ते म्हणाले.
प्रारंभी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रविंद्र कुंभार यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत केलेल्या कृत्रिम कुंडामध्ये मूर्तीचा विसर्जन करावे आणि निर्माल्य त्याच कृत्रिम कुंडात टाकावे याविषयी मार्गदर्शन केले. शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यात डॉल्बीमुक्त ,पर्यावरण पूरक ,सामाजिक उपक्रम आणि नियमाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळासाठी तालुका पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन गौरविले जाणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुंभार यांनी दिली.
या बैठकीस शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे ,सचिन पांढरे,सहाय्यक फौजदार सावंत,पोलीस कर्मचारी दिगंबर चिले,बाबा किटे , काशीद, गोसाळकर , पावरा ,यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी ,होमगार्ड मंडळाचे अध्यक्ष विविध संघटनांचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आमले यांनी आभार मानले.