पुणे शहरात हॉटेलमध्ये जेवण्यास गेलेल्या एका ग्राहकासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. मित्रासह हॉटेलमध्ये गेलेल्या युवकाकडे जेवणानंतर बिल आले. त्यावर सर्विस टॅक्स लावण्यात आल्याचे दिसले. मग त्याने यासंदर्भात हॉटेलच्या व्यवस्थापकाला विचारणा केली. त्याचा राग त्यांना आला.
हॉटेल मॅनेजर आणि हॉटेलच्या वेटरने मिळून त्या तरुणावर हल्ला केला. या मारहाणीत तो तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.काय आहे प्रकार
पुणे शहरातील ३८ वर्षीय व्यावसायिक हुजेफा अत्तरवाला एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या स्पाइस फॅक्टरी या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रही होते. जेवण झाल्यावर त्यांनी बिल मागवले. बिलाची एकूण रक्कम 2030 रुपये होती. या बिलात 176.50 रुपये सर्विस टॅक्स लावला होता. त्यामुळे त्यांनी बिलिंग काऊंटला जाऊन हॉटेल मॅनेजरला विचारणा केली.
मग भांडण अन् हाणामारी
अत्तरवाला यांनी सर्विस टॅक्ससोबत विचारणा केल्यावर हॉटेल मॅनेजरला राग आला. त्यांनी अपमानास्पद शब्दांत त्यांना बोलण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील शाब्दीक हल्ले वाढत राहिले. पुढे त्याचे रुपातंर हाणामारीत झाले. काचेच्या भांड्याने आणि बिअरच्या बाटलीने त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अत्तरवाला यांना चांगलाच मार लागला. या प्रकरणी हॉटेल मॅनेजर जम्मेकर सामल, वेटर मौसम कुंवर याच्यासह 3 इतर वेटरवर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मित्रही झाले जखमी
अत्तरवाल यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र अनिकेत परदेशी आणि राम त्यागी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आला, तर राम त्यागी यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताच्या बोटाला धारदार शस्त्राने जखमा केल्या गेल्या. जखमी झालेले अत्तरवाल यांनी ससून रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, यावेळी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.