राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात १० सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची उत्तरदायित्व सभा होणार आहे. तपोवन मैदानावर (Tapovan Maidan) सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या सभेत अजित पवार यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिली.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेला ५० हजारहून अधिक लोक उपस्थित राहतील, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. या सभेला पक्षाचे सर्व मंत्री, आमदार उपस्थित रहाणार असून नागरिकांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर २५ ऑगस्टला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दसरा चौकात जंगी निर्धार सभा झाली. त्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने सभेचे नियोजन केले आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, प्रलंबित प्रश्न निकालात काढण्यामध्ये अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. भविष्यातही कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे योगदान मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित केली आहे. तीन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा कोल्हापुरात झाली. त्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नाही. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले होते. परंतु, आम्ही त्यांचा सत्कार करू शकलो नव्हतो. म्हणून त्यांच्या सत्कारासाठी ही सभा होत असल्याचे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, औषध व प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या प्रमुखांसह राज्यभरातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
शरद पवारांनंतर कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर धडाडणार अजितदादांची तोफ!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -