क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीतून दुप्पट रक्कम मिळवून देण्याच्या प्रकरणात रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील पंढरीनाथ महाजन यांच्यासह सात जणांची ३७ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच अन्य चार संशयीतांच्या शोधासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, रेंदाळचे पंढरीनाथ महाजन यांना व्यंकटेश दशरथ भोई ( वय ३१, रा. बानेर – पुणे), प्रिती व्यंकटेश भोई (वय २९, रा. बानेर – पुणे), चेतन किरण मोहिरे (वय ३५), प्रणाली चेतन मोहिरे (वय ३२, दोघे रा. कबनूर), अजय मधुकर गायकवाड (वय ४६, रा. कोल्हापूर) आणि निखिल रमेश रेपाळ (वय ३५, रा. शहापूर- इचल), प्रगती विकास सोळांकुरे (रा. सांगली), इरफान माईद्दीन सय्यद (रा. मिरज) यांनी क्रिप्टो करन्सीत गुंतवणूकीतून दुप्पट रक्कम मिळवून देण्याचे अमिष दाखवले. त्यामुळे महाजन आणि त्यांच्या ६ मित्रांनी एकूण ३७ लाख ३१ हजार रुपये गुंतवले होते.
मात्र अडीच वर्षात काहीच परतावा न मिळाल्याने महाजन
यांनी गावभाग पोलीस ठाण्यात ८ जणांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील व्यंकटेश भोई, चेतन मोहिरे, अजय गायकवाड आणि निखिल रेपाळ या चौघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरीत ४ संशयीतांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अन्य कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. तक्रारींचा ओघ वाढत असल्याने फसवणुकीची रक्कम कोटीच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.