Monday, April 22, 2024
Homeकोल्हापूरधरण क्षेत्रात अतिवृष्टी; राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुला

धरण क्षेत्रात अतिवृष्टी; राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुलाकोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत बुधवारी पावसाने हजेरी लावली. शहरात दिवसभर वातावरण ढगाळ राहिले, अधूनमधून कोसळणार्‍या जोरदार सरींनी जनजीवनावर परिणाम झाला. दरम्यान, राधानगरी धरणाचा तीन क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा सायंकाळी खुला झाला. दोन धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली.

‘गुलाब’ चक्रीवादळाचा जिल्ह्यातही परिणाम जाणवला. शहर व परिसरात सकाळी काही काळ सूर्यदर्शन झाले, त्यानंतर मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळपासून अधूनमधून पाऊस हजेरी लावत होता. दुपारी आणि सायंकाळी काही काळ जोरदार पाऊस झाला. यामुळे रस्त्यावर पाणी साचले. पावसाने घराबाहेर पडलेल्यांचे काहीसे हाल झाले. फेरीवाले, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, स्टॉलधारकांचीही तारांबळ उडाली. काही काळ ऊन-पाऊस असा खेळ सुरू होता. शहराच्या काही भागांत इंद्रधनुष्याचेही दर्शन झाले.

धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने राधानगरीचा तिसर्‍या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा सायंकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी खुला झाला. या दरवाजातून 1,428 आणि वीजनिर्मितीसाठी सुरू असलेला 700 असा एकूण 2,128 क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. आज दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत सुमारे अर्धा फुटाने वाढ झाली. सायंकाळी पंचगंगेची पातळी 13.8 फुटांवर होती.

पाटगाव परिसरात 114 मि.मी.

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत दमदार पाऊस झाला. गेल्या 24 तासांत बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पाटगाव आणि घटप्रभा धरण परिसरात अतिवृष्टी झाली. पाटगाव परिसरात 114 मि.मी., तर घटप्रभा परिसरात 75 मि.मी. पाऊस झाला. राधानगरी धरण परिसरात 49 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत भुदरगड तालुक्यात सर्वाधिक 32.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. शाहूवाडीत 13.3 मि.मी., राधानगरीत 24.9 मि.मी., गगनबावड्यात 25.3 मि.मी., गडहिंग्लजमध्ये14.9 मि.मी., आजर्‍यात 25.8 मि.मी., तर चंदगडमध्ये 32 मि.मी. पाऊस झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -